डेल्टा प्लस व्हेरिएंट ‘चिंताजनक’ घोषित, केंद्राकडून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळला अलर्ट

नवी दिल्ली : देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या ( second wave of corona) प्रादुर्भावामध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा (Delta Plus variant)अधिक प्रभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाची दुसऱ्या लाटेवर आता कुठे नियंत्रण मिळण्याची शक्यता निर्माण झाली असताना आता पुन्हा डेल्टा प्लस व्हेरिएंटने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्यानंतर आता केंद्र सरकारने या व्हेरिएंटला चिंताजनक व्हेरिएंट जाहीर केले आहे. तसेच या तीनही राज्यांना केंद्र सरकारने हाय अलर्ट दिला आहे.

याविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये सांगण्यात आले आहे की, भारतीय सार्स कोव-2 जीनोमिक्स कंसोर्टियमने सूचना दिल्या आहेत की डेल्टा प्लस व्हेरिएंट सध्या ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ आहे. याचा प्रसार जलदगतीने होत आहे.

 केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, डेल्टा व्हेरिएंट भारतासहित 80 देशांमध्ये सापडला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यांत तसेच केरळ आणि मध्यप्रदेशमध्येही डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या राज्यांना अलर्ट केले जात आहे.

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी या व्हेरिएंटविरोधात प्रभावी आहेत. पण या लसींमुळे शरीरात किती प्रमाणात अॅन्टिबॉडी तयार होतात हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचही राजेश भूषण यांनी स्पष्ट केले. जगातील जवळपास 80 देशांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्याचे समोर आले आहे.

आता भारताचाही त्यात समावेश झाला आहे. भारतासोबतच अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, जपान,पोलंड, नेपाळ आणि रशियातही या प्रकारचे रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले 21 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 9 रुग्ण रत्नागिरीत, जळगावमध्ये 7, मुंबईत 2 आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे 7500 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: