मनसे नेते वसंत मोरेंनी अखेर मौन सोडलं,मुस्लीम समाजाचे मानले आभार

 

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २ एप्रिलच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंगे हटवण्याची आक्रमक भूमिका घेतली. राज यांच्या भूमिकेनंतर पक्षातील मुस्लीम पदाधिकारी दुखावले. अनेकांनी राजीनामे दिले. पुण्यात शहराध्यक्ष असलेल्या माजी नगरसेवक वसंत मोरे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मनसे शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांची उचलबांगडी करण्यात आली. वसंत मोरे यांच्या जागी साईनाथ बाबर यांना जबाबदारी देण्यात आली.

राज ठाकरेंनी ४ मेपर्यंत भोंगे हटवले नाहीत तर मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावा असा आदेश दिला. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू झाली. अनेक कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्या. या सर्व घडामोडीत पुण्यात मनसेचे वसंत मोरे कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित झाला.सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या मोरेंनी अखेर मौन सोडलं आहे.

वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलंय की, पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे. पण मी सध्या पुणे शहराचे नाहीतर माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय. साहेबांच्या आदेशानंतर मी माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो आणि त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली. आजची नमाज भोंग्याविना केली आणि भविष्यातही सहकार्य करू असं सांगितले. त्यामुळे माझ्या प्रभागातील सर्व मुस्लीम बांधवांचे आभार आहेत असं त्यांनी सांगितले.

Team Global News Marathi: