मनसे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे केली ही मागणी

 

आता कारमध्ये बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सीट बेल्ट लावावा लागणार आहे. म्हणजेच, आता कारच्या मागील सीटवर बसणाऱ्यांना सीट बेल्ट लावणं बंधनकारक असणार आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली. गडकरींच्या या घोषणेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी एक ट्वीट केलं आहे.

या ट्वीटमधून त्यांनी नितीन गडकरी यांच्याकडे एक मागणी केली आहे. तसेच, रस्त्यांची दुरावस्था आणि खड्डे यांवरुन राजू पाटील यांनी नितीन गडकरींना टोलाही लगावला आहे.

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यांच्या या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “सुरक्षेच्या दृष्टीने जसं सीटबेल्ट बांधणं अनिवार्य केलं आहे, तसंच रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवे उभं करण्याचीही तरतूद करा मंत्रीमहोदय!” महत्त्वाचं म्हणजे, राजू पाटील यांनी हे ट्वीट केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरींना टॅग केलं आहे. तसेच, हे ट्वीट करताना त्यांनी #आता_सहन_नाही_होत असा हॅशटॅग वापरला आहे. राजू पाटील यांनी नितीन गडकरींकडे केलेल्या मागणीचं नेटकऱ्यांकडून स्वागत होत आहे.

महामार्गांवर अपघातांचं सत्र सुरु आहे. आधी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा अपघात आणि त्यानंतर झालेला टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघात यामुळे महामार्गांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देशातील महत्त्वाच्या महामार्गांपैकी एक असणाऱ्या मुंबई-पुणे महामार्गावर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा अपघात झाला. याच अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघात अहमदाबादहून मुंबईला परतताना झाला. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत होते.

Team Global News Marathi: