आमदार लक्ष्मण जगताप यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला दे धक्का!

 

पुणे | पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपळेगुरवमध्ये राजकीय धक्का दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका शोभा आदियाल आणि त्यांचा मुलगा अमर आदियाल यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

सदर प्रवेशाच्या माध्यमातून आमदार लक्ष्मण जगताप हे येत्या काही दिवसांत चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक राजकीय धक्के देण्याच्या तयारीत असल्याचे राजकीय संकेत मिळत आहेत.शोभा आदियाल या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत. पिंपळेगुरवमधील सुदर्शननगर भागाचे २००७ ते १२ या काळात त्यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांनी आपला मुलगा अमर आदियाल यांच्यासह रविवारी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. पिंपळेनिलख येथे शोभा आदियाल यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस यांनी दोघांचेही पक्षात स्वागत केले. शोभा आदियाल यांच्या प्रवेशामुळे पिंपळेगुरव व सुदर्शननगरमध्ये भाजपचे राजकीय बळ वाढणार आहे.

Team Global News Marathi: