अल्पसंख्याक मंत्री नवाब मालिक यांनी दाऊदच्या बहिणीला ५५ नव्हे तर ५ लाख दिले; ईडीकडून टायपिंग मिस्टेकची कबुली

 

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय असलेल्या नवाब मलिक-दाऊद कनेक्शनप्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सक्तवसुली संचलनालयाकडून अर्थात ईडीने गुरुवारी न्यायालयात आपल्याकडून टायपिंग करताना चूक झाल्याची कबुली देण्यात आली. नवाब मलिक यांच्याविरोधातील पहिल्या रिमांडमध्ये त्यांनी दाऊदची बहीण हसीन पारकर हिला ५५ लाख रुपये रोख दिल्याचे म्हटले होते. त्यावरून भाजप नेत्यांनी रान उठवले होते.

मात्र, ही रोख रक्कम ५५ लाख रुपये इतकी नसून ५ लाख इतकी होती. आमच्याकडून रिमांड कॉपीमध्ये टायपिंग करताना चूक झाली, अशी माहिती ‘ईडी’चे वकील अनिल सिंग यांनी दिली. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून हा मुद्दा उचलून धरला जाण्याची शक्यता आहे.नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना गुरुवारी पीएमएलए न्यायालयात सादर करण्यात आले होते. यावेळी ईडीने आपल्या चुकीची कबुली दिली.

त्यावर नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी म्हटले की, तुम्ही पहिले रिमांड ५५ लाख रुपयांची रक्कम दाखवून घेतले आहे. नवाब मलिक यांना सारासार विचार करून अटक करायला पाहिजे होती, असे देसाई यांनी म्हटले. मात्र, ईडीचे वकील अनिल सिंग यांनी हा दावा फेटाळून लावला. दहशतवादी कारवायांसाठी पाच लाख रुपये किंवा एक रुपयाही दिलेला असो, त्याचा तपास झालाच पाहिजे, असे अनिल सिंग यांनी म्हटले.

Team Global News Marathi: