मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला रस्त्यावर उतरून पावसाळी परिस्थितीचा आढावा…..!
रात्रीपासून मुंबईत पडणाऱ्या पावसाने मुंबईत अक्षरशः हौदोस माजवला होता. आज सकाळी सायन, माटूंगा आणि दादर येथे सखल भागात पाणी साचण्याच्या बातम्या येत होत्या. हिंदमाता सारख्या सखल भागात गुडघाभर पाणी साचले होते.
त्यातच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील भागांची आज पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आयुक्त इक्बाल चहल हे ही उपस्थित होते.
मुंबईत आणि शहरातील इतर भागांमध्ये पावसानाने जोरदार हजेरी लावली होती. कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता परिसरात पाणी साचले आहे. या पार्श्वभूमीवरच आदित्य ठाकरे यांनी हिंदमाता या भागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच पालिकेनं केलेल्या उपाययोजनांची माहितीही घेतली.
तसेच येणाऱ्या ४८ तासात मुंबईसह ठाण्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने रेड अॅलर्ट जारी केला असून नागरिकांना कारण नसताना घराच्याबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. तसेच मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.