बार्शी : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला यामध्ये बार्शी तालुक्यातील दोन सुपुत्रानी आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे. चुंब चा असलेला अविनाश जाधवर हा देशात 433 व तर बार्शीचा असलेला अजिंक्य विद्यागर हा 789 रॅंकने यशस्वी झाला आहे. जाधवर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही शेतकरी कुटुंबाची आहे तर विद्यागर याचे आई वडील हे शिक्षक आहेत.

आज माझ्या गावाचे नाव देशात रोशन झाले पाहिजे, खूप अभ्यास करीन पण जिल्हाधिकारी होणारच अन् स्वप्न पूर्ण करणारच, अशी जिद्द ठेवली आणि यशस्वी झालो, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मागील वर्षात (2019) घेतलेल्या परीक्षेत 433 रॅंकने उत्तीर्ण झालेल्या अविनाश जाधवर यांनी दिली.
तर सातत्याने प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळते माझे स्वप्न हे यूपीएससी परीक्षा हेच होते असे अजिंक्य विद्यागर म्हणाला. विशेष म्हणजे दोघांनाही तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले आहे.
यापूर्वी तालुक्यातील सुजित बांगर (आयआरएस), रमेश घोलप (आयएएस), अभिजित बांगर (आयएएस), महादेव धारूरकर (आयएएस) यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे.
अविनाश जाधवर
चुंब डोंगरघाटात गाव. घरची परिस्थिती बेताचीच. आठ एकर जिरायत शेती. वडील भीमराव जाधवर नववी उत्तीर्ण तर आई विमल अशिक्षित. एक भाऊ जनार्दन जाधवर वकिली व्यवसायात बार्शीत कार्यरत तर दोन बहिणी विवाह होऊन सासरी नांदत आहेत.

अविनाश जाधवर यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण चुंब गावातील भगवान बाबा विद्यालय येथे झाले. दहावीमध्ये 84 टक्के गुण मिळाले अन् बार्शीच्या भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात विज्ञान शाखेत अकरावी, बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बारावीला 88 टक्के गुण मिळाले होते. पुणे येथे शासकीय कृषी महाविद्यालयात ऍग्रिकल्चरला प्रवेश मिळाला.त्यानंतर एमएस्सी ऍग्रिकल्चर, राहुरी विद्यापीठ, राहुरी येथे पूर्ण केले. पुढे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दोनवेळा परीक्षा दिली पण यश मिळाले नाही. तिसऱ्या प्रयत्नामध्ये यशस्वी झालो, असे जाधवर यांनी सांगितले.
मागील तीन वर्षांपासून दिल्ली येथे फक्त अभ्यास अन् अभ्यास… यासाठी खासगी क्लासेसमध्ये प्रवेश घेऊन अभ्यास केला. जिल्हाधिकारी होण्याचे ध्येय, स्वप्न होते. चुंब गावासह तालुक्याचे नाव यशोशिखरावर पोचवण्याची जिद्द होती, असेही अविनाश जाधवर यांनी आवर्जून सांगितले. आज निकाल जाहीर झाला मात्र अविनाश ते त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पुण्यात ससून रुग्णालयात अडकले असल्याने त्यांना आज कुटुंबासमवेत या यशाचा आनंद साजरा करता आला नाही याचे थोडे दुःख ही वाटले.
अजिंक्य विद्यागर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दोन वेळा उत्तीर्ण झालो. पण जिल्हाधिकारी होण्याची इच्छा होती. त्यामुळे यूपीएससीची तयारी सुरूच होती. शिक्षण सुरू असताना दोन वेळा यूपीएससी परीक्षा दिली, पण यश आले नाही. आता तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र यश प्राप्त झाल्याचे बार्शी येथील अजिंक्य विद्यागर यांनी सांगितले.

शिक्षणाशिवाय आपण काहीच करू शकत नाही. उच्च शिक्षण घेतले तर उच्च पदांपर्यंत पोचता येते. समाजाची सेवा करता येते. शासनाच्या विविध योजनांची समाजातील अखेरच्या घटकांपर्यंत माहिती होत नाही अन् लाभही होत नाही. त्यासाठी जिल्हाधिकारी होऊन कार्य करण्याची इच्छा मनाशी बाळगून अभ्यास केला आणि आज यशस्वी झालो, अशी भावना आयएएस परीक्षा उतीर्ण झालेल्या बार्शी येथील अजिंक्य विद्यागर यांनी व्यक्त केले.

अजिंक्य यांचे वडील प्रा. अनंत विद्यागर हे बार्शी येथील शिवाजी शिक्षण संस्थेत नौकरी ला होते नुकतेच ते सेवानिवृत्त झाले आहेत. आई आशा जोगदंड-विद्यागर आगळगाव येथील लोकसेवा विद्यालयात मुख्याध्यापिका आहेत. बहीण प्रियांका ही मागील महिन्यात जाहीर झालेल्या एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन उद्योग अधिकारी झाली आहे. अजिंक्य यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र विद्यालय येथे तर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण सुलाखे हायस्कूलमध्ये झाले. पुन्हा अकरावी, बारावी कला शाखेत प्रवेश घेतला. अजिंक्य यांचा पदवीला राज्यशास्त्र हा विषय होता. पदवीचे शिक्षण आबासाहेब गरवारे कॉलेज, पुणे येथे घेतले. पुणे विद्यापीठात 2018 मध्ये याच पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर सेट-नेट परीक्षा उत्तीर्ण झाले.
आपल्या यशाबद्दल अजिंक्य विद्यागर म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील परीक्षा दोन वेळा उत्तीर्ण झालो. पण जिल्हाधिकारी होण्याची इच्छा होती. शिक्षण सुरू असताना दोन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली, पण यश आले नाही. तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र यश प्राप्त झाले. खासगी क्लास व सेल्फस्टडी करून यश संपादन केले असून, 789 रॅंकने यशस्वी झालो.