एमआयएमची ‘ऑफर’ आघाडीने धुडकावली; म्हणाले, ही तर भाजपची ‘टीम बी’

 

एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रस्ताव दिल्याने शनिवारी त्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटले. मात्र, महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी ही ऑफर स्पष्ट शब्दात फेटाळली. ‘औरंगजेबासमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत युती होण्याचा प्रश्नच नाही’ असे सांगत शिवसेनेने लगेच हात झटकले. एमआयएमला आघाडीत घेण्याची शक्यता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी फेटाळली. यानिमित्ताने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

समविचारी पक्ष एकत्र येणे ही आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. पण समविचारी कोण हे तपासून बघावे लागेल, असे सांगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या विधानाला एकप्रकारे नकारच दिला. खासदार इम्तियाज जलील हे एमआयएमचा राजीनामा देऊन आले, तर त्यांना राष्ट्रवादीत घ्यायला काहीच हरकत नाही. नक्कीच पवार साहेब त्यांना पक्षात घेतील, असे विधान छगन भुजबळ यांनी केले.

या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, जलिल यांच्याशी मी अनौपचारिक चर्चा केली. महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या एमआयएमच्या प्रस्तावावर आघाडीचे नेते निर्णय घेतील, असे मी त्यांना सांगितल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Team Global News Marathi: