कोल्हापूर ‘उत्तर’मधून अधिकृत काँग्रेसकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी जाहीर

 

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी काँग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी, माजी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका जयश्री चंद्रकांत जाधव यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी दिल्लीतून जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा केली. यामुळे आता ‘उत्तर’मध्ये जाधव व भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यात सरळ लढत होणार आहे.

आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबर २०२१ मध्ये निधन झाल्याने ‘कोल्हापूर उत्तर’ची जागा रिक्त झाली होती. जाधव यांच्या शोकसभेवेळीच पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनाच उमेदवारी दिली जाईल, अशी घोेषणा सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती. जयश्री जाधव या २०१५ च्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर ‘सम्राटनगर’ प्रभागातून मोठ्या फरकाने विजयी झाल्या होत्या. नगरसेविका म्हणून त्यांचा कोल्हापूर शहरात संपर्क आहे.

तर दुसरीकडे कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी काँग्रेसकडून जयश्री चंद्रकांत जाधव यांची उमेदवारी निश्चित झाल्यापासून शिवसेनेचे माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर नॉटरिचेबल असल्याचे समजते. क्षीरसागर यांना थांबवल्याने शिवसेनेत नाराजी दिसत आहे. ‘कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघाची पोटनिवडणूक शिवसेनेतर्फे राजेश क्षीरसागर यांनी लढवण्याची तयारी केली होती. यासाठी त्यांनी दोन-तीन मेळावे घेऊन निवडणुकीची तयारीही केली होती. मात्र राज्यातील महाविकास आघाडीमुळे त्यांना थांबावे लागले.

Team Global News Marathi: