दूध का दूध, पानी का पानी’ होऊ द्या; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र |

 

मुंबई | मराठा आरक्षणाची पूर्णविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिलं आहे. ‘मराठा आरक्षणावर जाहीर सर्वपक्षीय चर्चासत्र घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊ द्याअशी मागणी थेट चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आरक्षणाचा निर्णय घेण्याची जबाबदारी कोणाची आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी नेमके काय केले पाहिजे याबाबत आरोप प्रत्यारोपांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण या विषयावर तज्ज्ञांच्या उपस्थितीत एक सर्वपक्षीय चर्चासत्र प्रसिद्धी माध्यमांच्या उपस्थितीत जाहीरपणे करावं. खुल्या चर्चेच्या आधारे मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी नक्की काय करावं याचा आराखडा तयार करावा असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

तसेच चर्चेचे थेट प्रक्षेपण केले म्हणजे राज्यभरातील असंख्य सर्वसामान्य समाजबांधवांना या मार्गदर्शनाचा लाभ होईल व त्यांच्या मनात स्पष्टता निर्माण होईल. चर्चेसाठी उपस्थित राहणाऱ्या तज्ज्ञांमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष न्या. एम. जी. गायकवाड, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले, ज्येष्ठ वकील रफिक दादा, डॉ. सर्जेराव निमसे आदी मान्यवरांचा समावेश असावा असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

Team Global News Marathi: