पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनशी संबंधित भूसंपादन, मोबदला, जागा हस्तांतरण हे विषय ३० सप्टेंबरपूर्वी मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.बीकेसीतील मेट्रो स्टेशनसाठीची जागा ३० सप्टेंबरपर्यंत देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. भूसंपादन, मोबदला, जमीन हस्तांतरणाच्या बाबीही पालघर तसेच ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
मुंबईसह राज्यातील मेट्रो प्रकल्पांसह इतर पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने आणि कालबद्धरीत्या पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी काम करावे. या प्रकल्पांना आवश्यक त्या परवानग्या तातडीने मिळवून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयातील वॉर रूममधून राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
पुणे मेट्रो, पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ, नागपूर येथील मेट्रो, तसेच विमानतळ या कामांबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले. मुंबई ते अहमदाबाद हा ५०८.१७ कि.मी. लांबीचा बुलेट ट्रेन प्रकल्प असून त्याला एक लाख आठ हजार कोटींचा येणार आहे. त्यावर १२ स्थानके असून त्यातील चार स्थानके महाराष्ट्रात आहेत. मुंबईतील एक स्थानक वगळून उर्वरित तिन्ही स्थानके उन्नत प्रकारातील आहेत. एमएमआरडीएमधील ४.८ हेक्टर जागा भूमिगत स्थानकासाठी ३० सप्टेंबरपर्यंत उपलब्ध करून देण्याचे काम एमएमआरडीएने करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.