पंढरपूर-मंगळवेढा पोट निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा चंपा म्हणून उल्लेख केला होता. आता याच मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापताना दिसत आहे. त्यात आता चंद्रकांतदादा पाटलांनी थेट अजितदादांना इशारा दिला आहे.
प्रकरण असे की, पंढरपुरात सभेत बोलताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा ‘चंपा’असा उल्लेख करत चंद्रकांत पाटील यांना डिवचले होते. अजित अनंतराव पवार म्हणजे अअप तसेच चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा असा शॉटफॉर्म होतो, असा टोला त्यांनी लगावला होता. चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना यावरुन संताप व्यक्त केला.
मला अजित पवारांना एक इशारा द्यायचा आहे. मला चंपा म्हणणे त्यांच्या लोकांनी खूप दिवस थांबवले होते. कारण मी त्यांना बोलायला लागलो तर महागात पडेन, असे सांगितले होते. आता हे थांबले नाही, तर त्यांचेसुद्धा जे शॉर्ट फॉर्म आहेत. त्यांच्या मुलापासून सर्वांचे शॉर्ट फॉर्म मला करावे लागतील, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
अजित पवारांना काय झाले आहे माहिती नाही. पण अलीकडच्या काळात ते जोरात आहेत. हिंदीमध्ये म्हण आहे की सौ चुहे खाके बिल्ली हज को चली,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला. चंद्रकांत पाटील पुढे बोलताना ते म्हणाले की, कधी कधी मला आश्चर्य वाटते. माझी शरद पवारांवरील पीएचडी अद्याप अपूर्ण आहे. पण आता मी अजित पवारांवर एम फील करणार आहे. मी काही प्राध्यापकांना त्यासाठी भेटणार आहे. एवढे सगळे प्रकार करुनही छातीठोकपणे कसे काय बोलतात याचा अभ्यास मी करणार आहे.