मी कुत्रा निशाणीवरही निवडून येतो, मंत्री अब्दूल सत्तार यांचा अजब दावा

 

बंडखोरीनंतर शिंदे गटात सामील झालेले राज्याचे कृषीमंत्री अद्बुल सत्तार नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतात. दरम्यान, एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी अजब वक्तव्य केलं आहे. जे सध्या चर्चेत आलं असून विरोधीपक्ष त्यांची खिल्ली उडवताना दिसत आहे. मला कुत्रा निशाणी मिळाली तरीही मी निवडून येतो. असं वक्तव्य सत्तार यांनी केलं आहे. मंत्री अब्दुल सत्तार हे ‘हिंदू गर्व गर्जना’ यात्रेच्या दरम्यान मंगरुळपिर येथे आले असता येथील जुन्या पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित सभेच्या वेळी सत्तार बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आम्हाला दोन मिनिटेसुद्धा भेटत नव्हते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री दोन वाजतासुद्धा भेटतात, माझ्या सिल्लोड मतदारसंघात सव्वातीन लाख हिंदू मतदार आहेत तर ५० हजार मुस्लिम मतदार आहेत आणि मी मुस्लिम असूनसुद्धा गेल्या २५ वर्षांपासून निवडून येत आलो आहे. मला जर ‘कुत्रा’ निशाणीवर उभे केले तरीही मीच निवडून येतो कारण की कुत्रासुद्धा मालकासोबत वफादार असतो असे सत्तार यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला.

तसेच, मी अगोदर काँग्रेसमध्ये होतो. नंतर एकनाथ शिंदे साहेबांमुळे शिवसेनेत आलो, परंतु हिंदू विचारसरणीवाल्या उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मी काँगेस सोडून शिवसेनेत आलो आणि ह्यांनी परत काँगेस सोबत हातमिळवणी केली. त्यामुळे आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हा ४० जणांना घेऊन भाजप सोबत सरकार स्थापन केले. असा किस्साही त्यांनी यावेळी सांगितला.

Team Global News Marathi: