औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्यावतीने गणपती उत्सवानिमित्त शहरातील संत एकनाथ रंगमंदिरामध्ये एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला सत्तांतर झाल्यानंतर दोन्ही गटाचे नेते एकाच सभाग़हात एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे सर्वांचेच त्याच्यांकडे लक्ष होते. त्यामध्ये सर्वात पहिली चकमक उडाली ती आमदार संजय शिरसाट आणि पोलिस विभागात. कारण शिरसाट यांच्या आधी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे नाव उच्चारल्याने शिरसाट नाराज झाले आणि भरकार्यक्रमातून उठून निघाले. मात्र त्याच्या बाजूलाच बसलेल्या खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांचा हात धरून थांबवलं.
त्याचे झालं असे की, सत्काराच्या वेळी सुत्रसंचालन करणाऱ्या सहायक आयुक्तांनी व्यासपीठावरील खैरे यांचे पहिले नाव घेताच दुसऱ्या टोकाला इम्तियाज यांच्या जवळ बसलेले शिरसाट यांनी आश्चर्यकारकरीत्या पाहत क्षणार्धात ताडकन उठत रामराम करत निघाले. जलील यांनी त्यांचा हात धरला. काय झाले, कोणाला कळेना. तेव्हा शिरसाटांनी रागात टिप्पणी करत प्रोटोकॉल आहे कि नाही, असे म्हणाले.
अशातच त्यानंतर कराड, सावे यांनी बसण्याचा आग्रह धरला. इम्तियाज यांनी त्यांचा हात सोडलाच नाही. त्यानंतर आयुक्त गुप्ता यांनी छातीवर हात ठेवत अधिकाऱ्यांना तत्काळ बदल करण्यास सांगितले. एकच धावपळ उडाली आणि नंतर वातावरण शांत झाले. खैरे यांचे नाव आधी घेतल्याने शिरसाट यांचा पारा चढला होता. मात्र इतर नेत्यांनी पुढाकर घेऊन त्यांना बसण्याची विनंती केली. त्यामुळे शिरसाट यांचा राग काही प्रमाणात कमी झाला. मात्र याचवेळी समोर बसलेल्यांमध्ये एकाने, खैरे साहाब, सिनियर है ना, क्या हुआ, अशी टिप्पणी केली.