बार्टीच्या धरतीवर अण्णाभाऊ साठे संशोधन केंद्र निर्माण व्हावे- माजी मंत्री रमेश बागवे

मातंग समाजाने न्याय आणि हक्क मिळवण्यासाठी संघटित होण्याची गरज – रमेश बागवे

बार्टीच्या धरतीवर अण्णाभाऊ साठे संशोधन केंद्र निर्माण व्हावे- माजी मंत्री रमेश बागवे

बार्शी : मातंग समाज विखुरलेला असून समाजाला न्याय आणि हक्क मिळवून घ्यायचा असेल तर समाजाने संघटित व्हायला पाहिजे असे प्रतिपादन मातंग हक्क परिषदेचे अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी केले.

बार्शीतील लिंगायत बोर्डिंग येथे अन्याय विरोधी आंदोलनाच्यावतीने मातंग हक्क परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर परिषदेचे स्वागताध्यक्ष बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार रामभाऊ गुंडीले, उदगीर माजी आमदार राजाभाऊ आवळे, मातंग परिषदेचे निमंत्रक माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे, श्रीधर कांबळे, प्रा जे टी जाधव, माजी नगरसेवक ज्योतिर्लिंग कसबे, अमोल चव्हाण, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे निलेश खुडे आदी उपस्थित होते.

श्री बागवे म्हणाले, सर्व एकत्र आले तर समाजाचे चित्र बदलेल. समाजातील तरुणाने शिक्षण, उद्योगात लक्ष द्यावे. बाबासाहेबांचे आपल्या दलित समाजावर खूप मोठे उपकार असून शासनाच्या विविध योजना समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, त्या पोहोचवण्याचे काम शिकलेल्या युवकांनी करावे. आपणच आपले पाय ओढायचे आता बंद केले पाहिजे असे सांगून समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरून प्रस्थापितांना धडा शिकवला पाहिजे असेही बागवे म्हणाले.

यावेळी हनुमंत साठे, अजिंक्य चांदणे, राजू आवळे, प्रा सुकुमार कांबळे, पृथ्वीराज साठे, अशोक लोखंडे, राम गुंडीले यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अन्याय विरोधी आंदोलनाचे प्रमुख माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता समाजबांधवांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन अनिल हातागळे यांनी तर आभार आनंद चांदणे यांनी मानले.प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने परिषदेस सुरुवात झाली.

मातंग परिषदेत हे सर्वानुमते करण्यात आलेले ठराव

१) लहुजी वस्ताद अभ्यास आयोगाची अंमलबजावणी व्हावी.२) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे स्मारक लवकरात लवकर व्हावे,३) बार्टीच्या धरतीवर आरटी अण्णाभाऊ साठे संशोधन केंद्र निर्माण व्हावे. ४) महाराष्ट्रातील रमाई घरकुल वरील घरपट्टी रद्द व्हावी.५)मातंग समाजातील जनतेला २०० युनिट वीज माफ व्हावी, मातंग समाजातील बेरोजगारांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा,

 

मातंग समाजातील तरुणांना उद्योगास प्रोत्साहन म्हणून एनएसएफडीसी योजना अण्णाभाऊ साठे महामंडळच्या माध्यमातून त्वरित सुरू करावी. ६)डॉ बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त व्यक्तींना महिन्याकाठी दहा हजार रुपये मानधन सुरू करावे

७) मातंग समाजातील वृद्ध कलावंतांना वाघ्या, मुरळी, आराधी, तमाशा कलावंत, रामोशी यांचे संशोधन होऊन त्यांना मानधन मिळावे तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या वतीने प्रत्येक तालुक्यात कला कौशल्य केंद्र उभारण्यात यावे.८) महाराष्ट्रातील नगरपालिका स्वच्छता कर्मचारी वारसा पद्धतीने ताबडतोब भरती करण्यात यावी.९) ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व्हावी महाराष्ट्रातील मातंग समाजावर होणारे अन्याय, अत्याचाराची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढावे.११) लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या शिफारशीनुसार मातंग समाजातील प्रत्येक कुटुंबाला अडीच एकर जमीन समाजकल्याण खात्याने त्वरित द्यावी.

ग्लोबल न्युज नेटवर्क: