गुरुवारी, ३० जून रोजी महाविकास आघाडी सरकारला बहुमताची चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. त्यावेळी ठाकरे सरकार कोसळणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे, अशा वेळी शिवसेना अंतिम क्षणी भविष्यातील हिंदुत्वाचें कार्ड शाबूत राहावे याकरता जोरदार प्रयत्न करू लागली आहे. त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून बुधवारी, २९ जून रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव शिवसेना मांडणार आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र त्यावेळी काँग्रेस त्याला विरोध करणार आहे. त्यामुळे बहुमत चाचणीच्या आधी महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

शिवसेनेचे हिंदुत्व कार्ड, तर काँग्रेसचे निधर्मीय विचारधारा वाचवण्याचा प्रयत्न 

एकनाथ शिंदे यांच्या गटाची नाराजी निर्णायक पातळीवर येत असतानाच भाजपाने मंगळवारी, २८ जून रोजी रात्री थेट राज्यपालांना भेटून महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे, त्यामुळे त्यांना बहुमत सिद्ध करण्याची सूचना केल्याने राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप झाला. त्यानंतर बुधवार, २९ जून रोजी सकाळीच राज्यपालांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी ३० जून रोजी विशेष अधिवेशन बोलावण्याचा आदेश दिला, अशा सर्व स्थितीत आता ठाकरे सरकार जाणार हे निश्चित झाले आहे.

 

अशा परिस्थिती ठाकरे सरकारने आता लोकाभिमूख निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेसाठी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा जो शिवसेनेसाठी अडचणीचा ठरला होता, तो मुद्दा निकाली काढून स्वतःचे हिदुत्व शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. नामांतराचा हा प्रस्ताव २९ जून रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे, अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मात्र त्याच वेळी या प्रस्तावाला कडाडून विरोध करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

 

सरकार पडणार आहे, अशा वेळी या नामांतराच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला तर काँग्रेसच्या निधर्मी विचारधारेच्या विरोधात होईल, त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील, त्यामुळे काँग्रेसने या प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधी काँग्रेसचे नेते सिल्वर ओक येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत भूमिका मांडणार आहे. त्यामुळे बहुमत चाचणीच्या आधीच ठाकरे सरकारमध्ये फूट पडणार आहे, अशी शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी, २९ जून रोजी होणारी ठाकरे सरकारची मंत्रिमंडळाची बैठक शेवटची बैठक असेल, असेही राजकीय विश्लेषक म्हणत आहेत.