मराठवाड्यात पुन्हा अवकाळीचा इशारा; वादळी वाऱ्यासह गारपीटाचा अंदाज

 

मराठवाड्यात ऐन उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून अवकाळी पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी जोरदार पावसासह गारपीट झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. अशात मराठवाड्यात आजपासून पुन्हा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर आजपासून 30 एप्रिलपर्यंत मराठवाड्यातील वेगवेगळ्या भागात वादळी वारा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही भागात गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार, मराठवाड्यात पुढील चार दिवसांत वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेच अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसात मराठवाड्यातील अनेक भागांना अवकाळीने झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे. तर काही लोक जखमी देखील झाले आहेत. त्यातच आता पुन्हा चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

27 एप्रिल रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना होईल. दरम्यान, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडेल. 28 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना होईल. दरम्यान, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडेल.

29 एप्रिल रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात, तर 30 एप्रिल रोजी नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना होईल. दरम्यान, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडेल.

दरम्यान 27 एप्रिल रोजी परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत, तर 28 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे, असा अंदाज परभणीच्या ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने वर्तवला आहे.

 

Team Global News Marathi: