‘भाकरी फिरवायची वेळ आली, विलंब करुन चालणार नाही’ पवारांचे सूचक विधान

 

युवक काँग्रेसच्या वतीने युवा मंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या एका विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. भाकरी ही फिरवावी लागते ती जर फिरवली नाही तर करपते. त्यामुळे आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. विलंब करून चालणार नाही. पक्षसंघटनेत याबाबत चर्चा केली जाईल, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये लवकरच काही बदल दिसण्याची शक्यता आहे.

बुधवारी झालेल्या कार्यक्रमात शरद पवार म्हणाले की, “समाजात काही व्यक्तींना पद असो अथवा नसो कार्यकर्त्यांमध्ये सन्मान असतो. तो सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पुढील पायरीवर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. संघटनेच्या माध्यमातून योग्य ती संधी देऊन एक नवीन नेतृत्व तयार केले जाईल, त्यामुळं आता विलंब करुन चालणार नाही, भाकरी फिरवायची वेळ आली आहे. जे अधिक काम करतील, त्यांना उद्या होणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये संघटनेच्या वतीनं निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल. त्यामधून एक नवीन नेतृत्व तयार केलं जाईल.”

माझा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे पाहण्याचा दृष्टीकोन असा आहे की, यातून दृष्टी असलेल्या कार्यकर्त्यांची फळी आपल्याला महाराष्ट्रात तयार करायची आहे. ही फळी आपण तयार केली तर महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद आजच्या तरुणांमध्ये आहे. आयुष्याच्या उमेदीच्या काळात अनेक गोष्टींची आपल्याला माहिती आणि संधी नसते. पण निर्धार पक्का असला तर आपण अडचणींवर मात करू शकतो. त्यामुळे पक्षाला नेतृत्व तयार करण्यासाठी तरूणांपासून सुरुवात करावी लागेल. जीवनात यशस्वी होण्यासाठी तरूणांनी विचारधारा आणि कष्ट या दोन गोष्टींचा आधार घेतला तर जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय ते थांबणार नाहीत

 

Team Global News Marathi: