मुंबई | चंद्रकांत पाटील हे केवळ समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करा, अशी मागणी सर्व मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर जिल्हाचे समन्वयकांनी केली आहे. या आरोपांमुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंगळवारी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीला अध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. बैठकीमध्ये मराठा समाजाच्या समन्वयकांनी चंद्रकांत पाटील यांना अनेक प्रश्न केले. मात्र, त्याची उत्तरे त्यांना देता आली नसल्याचे मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर जिल्हाचे समन्वयक कमलेश नवले म्हणाले. तसेच चेलेचपाटे, पाकीटमार बैठकीला बोलवून मराठा समाजाची फसवणूक बंद करा, असेही नवले म्हणाले.
चंद्रकांत पाटील मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही नवले यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी अन्यथा मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर जिल्हाच्यावतीने येत्या सोमवार (दि.१) मे रोजी सकाळी ११ वाजता भेंडा बसस्थानकासमोर चंद्रकांत पाटलांच्या प्रतिमेवर जोडे मारो आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवले यांनी पाठविले आहे. त्यामुळेच समितीच्या बैठकीमध्ये गोंधळाचा वातावरण निर्माण झाल्याचे सुकृतदर्शनिय दिसून येत आहे.