मराठा आरक्षणाचा पोपट मेलाय, हे राज्यकर्ते सांगून का टाकत नाहीत – आनंद दवे

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या निर्णयामुळे ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर आता विरोधकांनी जोरदार टीका राज्य सरकारवर केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्ह येऊन मराठा आरक्षण मिळवूनच देणार असा विश्वास बोलून दाखविला होता.

या निकालामुळे मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला पाहायला मिळत असताना ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी मराठा आरक्षणावर भूमिका मांडलेली आहे. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाचा पोपट मेला आहे, ही गोष्ट राज्यकर्ते लोकांना सांगत का नाहीत. सर्वांना सर्व काळ फसवता येणार नाही, याची सर्वच नेत्यांना कल्पना आहे. फक्त लोकांना सांगणार कोण, ही समस्या असल्याचे सांगत आनंद दवे यांनी मराठा नेत्यांना टार्गेट केले आहे.

पुढे ते म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी आता पुन्हा न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार. कोणी विधानसभेत ठराव मंजूर करायला सांगणार, कोणी पंतप्रधानांना नियम बनवायला सांगणार. खूप प्रेमाचे संबंध असणाऱ्या राज्यपालांना साकडे घालूनही काय होणार, याची सरकारलाही कल्पना असेल. मराठा तरुणांसाठी नोकरीत वेगळा कोटा ठेवू, असे विजय वडेट्टीवार सांगतात. पण हे मागच्या दाराने दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, ही बाब त्यांनाही माहिती असेल. हे सर्व करण्यापेक्षा आर्थिक आरक्षणाचा आग्रह धरावा, असे आनंद दवे यांनी म्हटले.

Team Global News Marathi: