आमदार राजेंद्र राऊत यांचा इशारा अन जिल्ह्याला मिळाले1890 रेमडीसीविर

सोलापूर : सोलापूर (Solapur) शहर व जिल्ह्याला कोरोना महामारीत बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. सोलापूर वर होणारा अन्याय आणि जिल्ह्यातील या भीषण स्थितीच्या विरोधात बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी राज्याचे मुख्य सचिव,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मंत्रालयातील अधिकारी, मंत्री यांच्यासमोर सोलापूर जिल्ह्याची कैफियत मांडली. सोमवारी दिवसभर त्यांनी सोलापूरवरील अन्यायाचा पाढा वाचल्यानंतर गुरुवारी (ता. १३ मे) सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील भाजप आमदार (MLA) व खासदारांच्या (MP) उपस्थितीत उपोषण करण्याचा निर्णय घेतला. आमदार राऊत यांनी उपोषणाचे हत्यार उपसताच आज (ता. ११ मे)  सोलापूर जिल्ह्याला आज तब्बल 1 हजार 890 रेमडेसिव्हिर इंजेक्शन प्राप्त झाले आहेत.

सोलापूर शहर व जिल्ह्यावर कोरोनाचे संकट आल्यापासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपोषणाच्या निर्णयामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळाले आहेत. आज मिळालेल्या 1890 इंजेक्शनमधील 775 इंजेक्शन हे सोलापूर शहरासाठी दिले जाणार आहेत. बार्शी व उत्तर सोलापूर तालुक्यासाठी 273, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यासाठी 53, पंढरपूर व मोहोळ तालुक्यासाठी 321, सांगोला व मंगळवेढा तालुक्यासाठी 136, माळशिरस तालुक्यासाठी 198, माढा व करमाळा तालुक्यासाठी 134 असे एकूण 1890 रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळाले आहेत.

 

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, आज 1890 इंजेक्शन मिळाले असली तरीही गुरुवारी (ता. 13) आम्ही भाजपचे आमदार व खासदार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत. सोलापूर जिल्ह्याला नियमितप्रमाणे मुबलक ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्शन व कोरोना लसीचा पुरवठा व्हावा. कोरोना अँटिजेंन चाचणीच्या किटसही मुबलक प्रमाणात मिळाव्यात. सोलापूर जिल्ह्यावर होणारा अन्याय या उपोषणाच्या माध्यमातून सर्वांच्या समोर आणला जाणार असल्याचेही आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

काय म्हणाले होते आमदार राऊत

केंद्र व राज्य सरकारमार्फत  रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सीजन पुरवठा व कोविड लसींचा पुरवठा पुणे विभागातील जिल्ह्यांना केला जात आहे. पण सोलापूर  जिल्ह्याला सापत्न वागणूक देऊन रुग्णांच्या संख्येनुसार इंजेक्शन, ऑक्सिजन, लशींचा पुरवठा होत नाही, याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे  खासदार व आमदार  येत्या गुरुवारी (ता. १३ मे) सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत, अशी माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.

पुणे विभागासाठी  ता.12 एप्रिल 2021 ते 10 मे 2021 या कालावधीत  केंद्र व राज्य सरकार यांच्याकडून रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन व कोवीड लस पुरवठा करताना पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यावर अन्याय होत आहे. सोलापूर जिल्ह्याला रुग्णांच्या प्रमाणात रेमडेसिव्हिर इंजेक्शन दिली जात नाहीत, ऑक्सिजनचा पुरवठा अद्यापी सुरळीत केला जात नाही, कोविड लस ही लोकसंख्येच्या प्रमाणात दिली जात नाही, टेस्ट किटचा पुरवठा जिल्ह्याला कमी प्रमाणात केला जातो.

याउलट पुणे विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्ह्याचे मंत्री आहेत, त्यांच्या जिल्ह्यास झुकते माप देऊन सोलापूर जिल्ह्याचाही कोटाही इतर जिल्ह्यांना दिला जात आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कोविड रुग्णसंख्या वाढत आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या मृत्यूदरांमध्ये झालेला आहे. यापूर्वी वेळोवेळी आम्ही प्रशासनामधील संबंधित अधिकाऱ्यांना पाठपुरावा करूनही कोणतीही पूर्तता केली जात नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आम्ही गुरुवारी (ता. 13 मे)  सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: