शिवेंद्रराजेंसह भाजपचे अनेक आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार..

शिवेंद्रराजेंसह भाजपचे अनेक आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार, नवाब मलिक यांचा दावा

 

आमदार शिवेंद्रराजे यांच्यासह भाजपमध्ये गेलेल्या अनेक विद्यमान व माजी आमदारांचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. हा सोहळा काही दिवसातच आयोजित केला जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनानिमित्त परभणीत आलेले पालकमंत्री नवाब मलिक यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मराठवाड्यात विकासाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय, परभणीत देखील दरडोई उत्पन्न वाढविण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी खादी निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट या ठिकाणी उभा केला जाणार आहे. सध्या खादीचा ट्रेंड असून रेमंड, अरविंद सारख्या कंपन्या 2 हजार रुपये मीटर एवढ्या दराने खादीची विक्री करत आहेत.

 

तेव्हा परभणीतील जवळपास अडीच हजार लोकांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून हा खादी निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट माझ्या खात्यांतर्गत उभा केला जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री नवाब मलिक यांनी केली. या माध्यमातून अडीच हजार घरांमध्ये चरखा देऊन घरातूनच खादी निर्मितीची संकल्पना त्यांनी मांडली. या माध्यमातून एका कुटुंबाला दरमहा साधारणपणे पंधरा हजार रुपयांचे उत्पन्न होणार असल्याचे देखील ते म्हणाले.

विद्यमान, माजी आमदारांचा राष्ट्रवादी प्रवेश सोहळा

दरम्यान, साताराचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी नुकतीच भेट घेतली होती. त्यानंतर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबतची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला दुजोरा देत नवाब मलिक यांनी शिवेंद्रराजेंसह अनेक माजी आणि विद्यमान आमदारांचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचे सांगितले.

 

भाजपमध्ये गेलेले 100 टक्के लोक वापस येण्यास इच्छुक आहेत, मात्र त्या सर्वांचाच प्रवेश करून घेणे शक्य नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. परंतु, निवडक लोकांचा प्रवेश सोहळा लवकरच होणार असल्याचे मलिक म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: