मंत्रिपद मिळावे यासाठी देवीकडे साकडे घालणार

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर सगळे आमदार गुवाहाटीला गेले. तिथे एकनाथ शिंदेंनी सर्व आमदारांसह कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर गोवा मार्गे सगळे आमदार विधीमंडळात दाखल झाले आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे, मंत्री आणि आमदारांसह गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जात आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे आमदार आणि खासदार कुटुंबासह गुवाहाटीला जात आहेत. आज मुंबई विमानतळावरून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे १७८ सदस्य गुवाहाटीच्या दिशेने विशेष विमानाने उड्डाण करणार आहेत. यासाठी हे सर्व आमदार-खासदार विमानतळावर दाखल झालेले आहेत. याचदरम्यान, गुवाहाटीला निघण्याआधी शिंदे गटाचे हिंगोलीतील आमदार संतोष बांगर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारमध्ये मंत्रिपद मिळावे अशी अनेक नेत्यांची इच्छा होती. यातीलच एक संतोष बांगर हेदेखील होते. आता याच मंत्रिपदाबाबत बोलताना ते म्हणाले, मला मंत्रिपद हवे आहे. या मागणीसाठी मी देवीकडे साकडे घालणार आहे. ही माझी दादागिरी नाही, तर स्टाईल आहे, असे ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, आमदार संतोष बांगर यांचा काल एक व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये त्यांनी एका कर्मचाऱ्याला फोन करून मारहाणीची धमकी दिल्याचे दिसले. माहितीनुसार, महावितरणचे कर्मचारी थकीत बिलामुळे लाईन तोडण्यासाठी तगादा लावत असल्याचे प्रकरण आमदार संतोष बांगर यांच्याकडे गेले होते. यावर आमदार बांगर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आहे.

Team Global News Marathi: