“मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान असायला हवं” – अमृता फडणवीस

 

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर तब्बल ३८ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार केला. यानंतर काही दिवसांनी खातेवाटप जाहीर झाले. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात महिलांना स्थान नसल्यावरून जोरदार टीका करण्यात आली होती. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून, मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान असायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने आता अधिक ताकदीने आणि जोमाने राज्यकारभार करायला हवा. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र राज्य थोडे मागे पडले आहे. पायाभूत सुविधा आणि प्रोजेक्ट्स यावर भर देऊन नव्या सरकारला डबल मेहनतीने काम करणे आवश्यक आहे, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले. तसेच मंत्रिमंडळात महिलांनाही स्थान असायला हवे, अशी अपेक्षा अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली.

महिलांनी पुरुषांप्रमाणे अधिक मेहनत करून कमांड मिळवायला हवी. डिमांड करण्यापेक्षा कमांड असण्यावर भर द्यावा, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले. महिलांना प्रत्येक क्षेत्रात स्थान असायलाच हवे. पुरुषांपेक्षा अधिक मेहनतीने महिला त्या स्थानी बसतील, तेव्हा तिला मिळणारा आदर मोठा असेल, असेही त्यांनी नमूद केले.

Team Global News Marathi: