मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा निवडणूक; भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा निवडणूक; भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपला उमेदवार निश्चित केला आहे.  पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने मंगळवेढा येथील उद्योगपती व संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दिल्ली येथे केंद्रीय भाजप समितीने श्री. अवताडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. यामुळे आता पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होणार आहे.

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान महादेव आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे भालके विरुद्ध आवताडे असा सरळ सामना रंगणार आहे. एकास एक उमेदवार समोर असल्याने भाजपाने सहानुभूतीच्या लाटेतही महाविकास आघाडी समोर तगडे आव्हान उभे करणार असे दिसत आहे.

पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार असलेले समाधान आवताडे यांनी 2014 साली शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. तर 2019 ला ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दोन्ही निवडणुकीत त्यांना जवळपास 60 हजार मते पडली होती.

समाधान आवताडे हे उद्योजक आहेत. या पोट निवडणुकीत भाजपा कडून आ. प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांच्या उमेदवारीसाठी मोठी चुरस होती. मात्र भाजपच्या वरिष्ठांनी परिचारक यांना थांबविण्यात यश मिळविले आहे. आमदार परिचारक गटाने समाधान अवताडे याना पाठिंबा देण्याचे मान्य करत पंढरपुर शहरासह 22 गावांतून मताधिक्य देण्याचा शब्दही पक्षश्रेष्ठींना दिला आहे. त्यामुळेच आवताडेंना  भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: