राज्यात होणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे. त्यातच आता आगामी काळात मुंबई महानगर पालिकेसह राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. मागच्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा नाशिक आणि पुण्यात पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर मनसेने मोठा निर्णय घेतला असून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. अमित ठाकरे यांची निवड महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली आहे. या पूर्वी हे पद शिरोडकर यांच्याकडे सोपवण्यात आले होते मात्र त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला होता त्यामुळे हे पद रिक्तच होते.
अमित ठाकरे यांना अध्यक्षपद देण्यात आल्यानंतर आज सकाळी मनसेच्या मुंबईतील राजगड या मध्यवर्ती कार्यालयाने एक पत्रक प्रसिद्ध करून या संदर्भातील घोषणा करण्यात आली. मराठी भाषा दिनानिमित्त मनसे नेते अमित ठाकरे यांची मनसे विध्यार्थी सेने पदावर नियुक्ती करण्यात आली आहे असे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. या निवडीमुळे पुढच्या काळात अमित ठाकरे हे मनसेमध्ये अधिक सक्रिय झालेले दिसू शकतात.