मलिक-वानखेडे वाद: उज्ज्वल निकम यांनी दिला ‘हा’ धोक्याचा इशारा

तपास यंत्रणेबाबत निर्माण केले जाणारे प्रश्नचिन्ह :  कायदा आणि सुव्यवस्थेसाठी अतिशय वाईट – उज्ज्वल निकम

मलिक-वानखेडे वाद: उज्ज्वल निकम यांनी दिला ‘हा’ धोक्याचा इशारा

सांगली : तपास यंत्रणेबाबत निर्माण केले जाणारे प्रश्नचिन्ह हे देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी अतिशय वाईट गोष्ट आहे, तपास यंत्रणांनीसुद्धा तपास करताना संयम बाळगावा, उगाच चमकोगिरी करू नये, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. सांगलीमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्य सरकार अथवा केंद्र सरकार यांच्या तपासी यंत्रणेबाबत सध्या अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ही अतिशय वाईट गोष्ट आहे. तपास यंत्रणांनीदेखील एखाद्या घटनेचा तपास करताना अतिशय संयम बाळगला पाहिजे. उगाच चमकोगिरी करून वाटेल तशी पत्रक काढून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी ही टाळायला हवी. जेणेकरून तुमच्या या कृत्यांमुळे राजकीय व्यक्ती तुमच्यावर टीका करायला उपयुक्त ठरणार नाहीत याचीदेखील अधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे, अस मत विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी व्यक्त केले.

राजकीय नेत्यांनी जर तपास यंत्रणा आणि त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि तोही तपास चालू असताना, तर मला वाटते की हा कायदा व सुव्यवस्थेला मोठा धोका आहे. जर राजकीय व्यवस्थेला वाटत असेल की तपास यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतो, तपास चुकीचा आहे, गैर आहे तर त्याकरिता न्यायालय आहेत तेथेही दाद मागता येते. केवळ प्रसिद्धिमाध्यमातून तपास यंत्रणेबद्दल शंका उपस्थित करण योग्य नाही, अणेही उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.

दरम्यान, आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे सातत्याने एनसीबीला लक्ष्य करत आहेत. पूर्ण प्रकरणच बनावट असल्याचा त्यांचा आरोप आहे. याशिवाय त्यांनी एनसीबीचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरही विविध आरोप केले आहेत. याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही एनसीबीवर अप्रत्यक्ष टीका केल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची ही प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: