जिल्ह्यातील नुकसानीचे सरसकट पंचनामे करा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना

जिल्ह्यातील नुकसानीचे सरसकट पंचनामे करा
नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना

पंढरपूर :- जिल्हयात अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त एकही शेतकरी, नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही. यासाठी सरसकट पंचनामे करावेत अशा सूचना महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

श्री.पांडूरंग सहकारी साखर कारखानाच्या 32 व्या गळीत हंगाम शुभारंभ व आसवनी प्रकल्प उद्घाटन शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री श्री. विखे- पाटील बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, संत दामाजी सह.साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, पांडूरंग सह.साखर कारखान्याचे संचालक उमेश परिचारक, धैर्यशिल मोहिते पाटील, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, प्रांताधिकारी ज्योती कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शिवपूजे, तहसिलदार जगदीश निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री विखे-पाटील बोलताना म्हणाले, जिल्हयात अतिवृष्टी व सततच्या पावसाने शेतपिकांसह शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. प्रशासनाने योग्यती खबरदारी घेवून या नुकसानीचे पंचनामे करण्याला प्राधान्य द्यावे सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे पुर्ण करुन तसा अहवाल शासनाला तात्काळ सादर करावा. असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. तसेच शेती महामंडळाच्या कामगारांचे पुनवर्सन करण्याबाबत तात्काळ बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.

 

केंद्र शासनाने साखर धोरणाची निश्चिती केल्याने सहकार क्षेत्र टिकले आहे. साखर कारखान्याला इथेनॉलचे धोरण वाचविणार असून, साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती बरोबरच इतर उप-पदार्थ निर्मिती करावी. श्री.पांडूरंग सहकारी साखर कारखान्यानी वीज निर्मिर्ती ,इथेनॉल निर्मिती तसेच पोटॅश निर्मिती बरोबरच योग्य व्यवस्थापन केल्याने राज्यासमोर नवा आदर्श निर्माण केल्याचे पालकमंत्री विखे-पाटील यांनी सांगितले. तत्पुर्वी पालकमंत्री विखे-पाटील यांनी जिल्हयात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांची हेलिकॉप्टरमधून पाहणी केली.

उजनी धरणातील हक्काचे पाणी सोलापूर जिल्ह्याला मिळावे अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. तर सोलापूर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मोठ्याप्रमाणात रिक्त असल्याने ती तात्काळ भरावित तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीबाबत जादाचा मोबदला मिळावा अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली.

 

श्री.पांडूरंग सहकारी साखर कारखाना साखर उद्योगावरच अवलंबून न राहता वीज निर्मिती, इथेनॉल निर्मिती, पोटॅश निर्मिती व उत्तम व्यवस्थापन केल्याने शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उसाला दर देता आला. श्री.पांडूरंग सहकारी साखर कारखान्याला राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: