‘महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी’

 

औरंगाबाद | भारतीय जनता पार्टी एकीकडे महाविकास आघाडीला खिंडार पाडण्याची भाषा करतं आहे तर दुसरीकडे ओवेसींच्या एमआयएमनं महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची तयारी दाखवली आहे. महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी असल्याचं समोर आलं आहे. शरद पवारांपर्यंत निरोप पोहोचवा, अशी विनंती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना केली आहे.

एमआयएमच्या या ऑफरनंतर आता शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एमआयएमकडून आघाडीची ऑफर देण्यात आली आहे. भाजपला हरवायचं असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवं, असं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत खासदार इम्तियाज जलील यांनी वक्तव्य केलं आहे. शिवसेनेसोबतही आघाडीची एमआयएमची तयारी असल्याचं बोललं जातंय.

औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हा निरोप शरद पवारांपर्यंत पोहोचवण्याची विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना केली आहे. शिवसेनेच्या कट्टर हिंदुत्ववादाचा मुद्दा जलील यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला असता, भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत जलील यांनी व्यक्त केलं. आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीसोबत नवी आघाडी करण्याची ऑफर एमआयएमनं दिली. इम्तियाज जलील यांच्या घरी सांत्वन भेटीसाठी गेलेल्या मंत्री राजेश टोपे यांची बैठक झाली. यात आपला निरोप पवारांपर्यंत पोहोचवण्याची विनंती जलील यांनी केली.

जलील म्हणाले की, आमच्यावर आरोप करण्यात येतो की भाजप आमच्यामुळे जिंकते. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटायला आले असता त्यांना ऑफर दिली आहे. एकदा हे संपवायचं असेल, तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का? त्यावर ते काही बोलले नाहीत. आता बघायचं आहे की त्यांना फक्त आरोप करायचे आहेत की त्यांना त्यांची भूमिका सिद्ध करायची आहे

Team Global News Marathi: