महाविकास आघाडीला सामान्यांशी देणेघेणे नाही, केवळ कमाई करण्यावर भर – चंद्रकांत पाटील

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला सामान्य लोकांची चिंता नाही. सत्ता किती काळ टिकेल याचा भरवसा वाटत नसल्याने सगळा भर कमाई करण्यावर आहे आणि राज्यात भ्रष्टाचाराने टोक गाठले आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी मुंबईत केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना त्यांचे सरकार किती टिकेल याची खात्री वाटत नाही, त्यामुळे ते वारंवार सरकार पाच वर्षे टिकेल म्हणून सांगतात. परंतु सत्ता उद्या जाईल तर आज कमाई करून घ्या, असे या आघाडीच्या नेत्यांचे धोरण आहे. त्यांना सामान्य लोकांशी काही देणेघेणे नाही. आघाडी जनतेसाठी निर्णय करत नसल्याने मराठा आरक्षण गेले तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावले. महाविकास आघाडीचे नेते कोडगेपणाने केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलत आहेत. या आघाडीने भ्रष्टाचाराचे टोक गाठले आहे, तसेच खोटारडेपणाचेही टोक गाठले आहे.

त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वारंवार जनतेच्या प्रश्नांवर आंदोलने करून या सरकारवर अंकूश ठेवला आहे. भाजपाने विरोधी पक्षाची भूमिका प्रभावीपणे बजावली आहे. भाजपाच्या दबावामुळे दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. शेतकरी, वीज ग्राहक, मराठा समाज, ओबीसी, वंचित घटक अशा विविध घटकांसाठी भाजपाने आंदोलने केली आहेत. भाजपाने महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडले नसते तर त्यांना राज्यात स्वैराचार करण्यास खुले रान मिळाले असते.

Team Global News Marathi: