महाविकास आघाडीच्या ३ मतांवर भाजपाचा आक्षेप; निवडणूक आयोगाकडे दाद मागणार

 

राज्यसभा निवडणुकीसाठी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत २८५ पैकी २३८ आमदारांनी मतदारांनी हक्क बजावला असून महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. सकाळी नऊ वाजता मतदानाला सुरुवात झाली. ३ तासात २३८ आमदारांनी मत दिलं. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरु राहणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

प्रत्येकी एक-एक मताला महत्व आलं आहे. तसंच आपण केलेलं मतदान अवैध ठरणार नाही आणि पक्षावर नामुष्की ओढवणार नाही, याचीही काळजी आमदारांनी घेतली आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या मतावर भाजपाचे नेते आशिष शेलार आणि नेते पराग अळवणी यांनी आक्षेप घेतला होता. मात्र स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपाने घेतलेला आक्षेप फेटाळून लावला आहे.

पराग अळवणी झालेल्या प्रकरणाबाबत म्हणाले की, मी स्वतः केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा पोलिंग एजंट या नात्याने यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतदानाबद्द्ल आक्षेप घेतला आहे. मतदान करतांना प्रत्येक पक्षाच्या मतदाराने त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीला एका अंतरावरुन मतपत्रिका दाखवायची असते, यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांनी मतपत्रिका एजंटच्या हातात दिली. याबाबात आक्षेप आम्ही नोंदवला, अशी माहिती पराग अळवणी यांनी दिली.

स्वतःच्या प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवायची असते मात्र कांदे यांनी स्वतःच्या पक्षाबरोबर इतर पक्षाच्या निवडणूक प्रतिनिधीला दिसेल अशी मतपत्रिका दाखवली, या कृतीमुळे हे मत बाद होतं.व्हिडिओ शुटिंग झालेलं आहे, नियमांचा भंग झालेला आहे, ही ३ मतं बाद करण्यात यावी अशी आमची मागणी आहे, असं पराग अळवणी म्हणाले. तसेच सदर प्रकणाबाबत भाजपा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Team Global News Marathi: