नगर | कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे अशातच दिवसेंदिवस रंगत वाढत असून अहमदनगर जिल्ह्यातील आजी माजी महसूलमंत्र्यांच्या मतदारसंघात दोन्ही नेत्यांनी एकमेकविरोधात पॅनल उभे केल्याने पुन्हा एकदा थोरात विरुद्ध विखे यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अपक्ष आमदार सत्यजीत तांबे सहभागी झाले असून त्यांनी नाव न घेता पदवीधर निवडणुकीत उघड मदत करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा साधला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून संगमनेर मध्ये विखेंच्या नेतृत्वात तर राहत्यात थोरात यांच्या नेतृत्वात पॅनल एकमेकांच्या विरोधात पॅनल उभे करण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावात महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास मंडळाची प्रचार शुभारंभ सभा संपन्न झाली. यावेळी अपक्ष आमदार सत्यजीत तांबे देखील मामांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असल्याचे दिसून आलं. यावेळी मामा भाच्याने विखेंवर टीका करत हे दहशतीचे वातावरण आपल्या तालुक्यात येऊ द्यायच नाही असे आवाहन केले आहे.
बाळासाहेब थोरात यांना ज्यांनी ज्यांनी विरोध केला ते पुढच्या निवडणुकीत त्यांच्या बरोबर दिसले हा इतिहास आहे. पलीकडून एक विमान निघालेल आहे. त्याला ना पायलट ना त्यांच्यात इंधन अशी अवस्था… ते विमान कुठं तरी धडकल्याशिवाय राहणार नाही, फक्त ते आपल्या तालुक्यात धडकून आपलं नुकसान होणार नाही, यासाठी आहे तसे विमान परत पाठवण्याच काम आपल्याला करायचं आहे अशी टीका अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी विखेंच नाव घेता केली आहे.