महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर जाणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ही सुनावणी मंगळवारी होण्याची शक्यता आहे. न्यायालयातील त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायमूर्ती आज उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर गेली आहे. महाराष्ट्रात नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं असलं, तरी सत्तापेच मात्र कायम आहे. कारण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
23 ऑगस्ट म्हणजेच (मंगळवारी) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी होऊ शकते, असं सांगितलं जात आहे. यापूर्वी हे प्रकरण २२ तारखेला सहाव्या क्रमांकावर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात होतं. पण आता पुन्हा लांबणीवर गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरला आहे. गेल्या तीन तारखा लांबणीवर गेल्यामुळं आता तरी सुनावणी होणार का? याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, सध्याचे सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या कारकिर्दीत प्रकरणातच या सत्तासंघर्षाचा ऐतिहासिक फैसला होणार की, मोठ्या पीठाकडे प्रकरण सोपवलं जाणार? हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या निवृत्तीची तारीख २६ ऑगस्ट आहे. त्यात सत्तासंघर्षावरील सुनावणी लांबत असल्यानं खंडपीठ हेच राहणार का? याबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तातडीच्या सुनावणीसाठी उद्धव ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाकडे पुन्हा मेन्शनिंग करावं लागेल पण ती विनंती मान्य होईल का? याचीही उत्सुकता लागली होती. उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीश साळवे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहे.