महाराष्ट्राने विविध क्षेत्रांत देशाला दिशा दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठात तंत्रशास्त्र विद्यापीठाचे केंद्र सुरू होत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येकाने ध्येय समोर ठेवून परिपूर्णतेसाठी प्रयत्न केल्यास महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात नेहमी पुढे राहील,” असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेच्या प्रादेशिक केंद्राचे उद्घाटन झाले. या प्रसंगी राज्यपाल बोलत होते. “तंत्रशास्त्र किंवा आरोग्यासारख्या एखाद्या विशेष शाखेच्या विद्यापीठाची निर्मिती त्या क्षेत्रातील विशेष अभ्यासक्रम राबविण्यासाठी करण्यात येते. अशा प्रादेशिक केंद्राच्या माध्यमातून इतर विद्यापीठांशी जोडलेल्या शैक्षणिक संस्थांना लाभ होईल. त्यादृष्टीने सुरू केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रादेशिक केंद्र शिक्षणातील उत्तमतेला चालना देणारे केंद्र बनावे.”
आज तंत्रशिक्षणात वेगाने प्रगती होत आहे. या क्षेत्रातील ज्ञानाकडे बारकाईने लक्ष दिले गेले नाही, तर जगात आपण मागे पडू. त्यामुळे विद्यापीठांनी परस्पर सहयोगाद्वारे तंत्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तांत्रिक ज्ञानाच्या क्षेत्रात देश समर्थ करण्याच्या दृष्टीने नव्या ज्ञानाबाबत विद्यार्थ्याला अद्ययावत करण्यासाठी प्रादेशिक केंद्र महत्त्वाचे ठरते, असेही राज्यपाल म्हणाले.