महाराष्ट्राचे राजकीय वातावरण किती गढूळ झाले हे तुरुंगातून बाहेर पडताच पुन्हा जाणवले

 

तीन महिन्यांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे घोटाळा प्रकरणी तुरुंगात होते. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला असून ते आता तुरुंगाबाहेर आहेत. राऊत तुरुंगात असताना अनेक राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेनेचे चिन्ह, पक्षनाव गोठवण्यापासून अनेक प्रसंग घडले. यावर राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून आपली भूमिका मांडली. यात त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

“तुरुंगात असताना नितीन गडकरी यांचे एक भाषण वाचनात आले. त्यांनी परखडपणे सांगितले की, ‘राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर मला आजवर अनेक माणसे भेटली. यात खूप मोठी वाटणारी माणसे खुजी निघाली तर प्रत्यक्षात जी माणसे मला छोटी वाटायची ती प्रत्यक्षात उत्तुंग निघाली. दिल्लीचे पाणी चांगले नाही.

गडकरी यांनी जे म्हटले ती आज जनभावना का बनली, याचे उत्तर दिल्लीच्या आजच्या वतनदारांनी शोधायला हवे. पण आजच्या वतनदारांना त्यांच्या मनासारखे उत्तर हवे असते. ते देणार नाहीत ते शत्रू ठरतात’, अशा शब्दांत केंद्र सरकारचा ‘दिल्लीचे वतनदार’ म्हणून उल्लेख करत राऊतांनी टीका केली आहे.

महाराष्ट्राचे राजकीय वातावरण किती गढूळ झाले आहे व अनेक लोक एकमेकांना कायमचे संपवायला निघाले आहेत, हे ९ नोव्हेंबर रोजी तुरुंगातून बाहेर पडताच पुन्हा जाणवले. आर्थर रोड तुरुंगाच्या मुख्य दरवाजाबाहेर एक लहानसा स्मृतिस्तंभ उभा केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक स्वातंत्र्यवीर आणि क्रांतिकारकांचे आर्थर रोड तुरुंगात वास्तव्य होते. त्या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती जतन करण्यासाठी हा स्तंभ उभा केला, पण लोकशाही आणि स्वातंत्र्याचा आता लवलेशही उरलेला नाही, असे राऊत म्हणाले.

Team Global News Marathi: