महाराष्ट्र भूषण पुरस्कार निळू फुले यांनी नाकारला ; अन दिला हा सल्ला

 

ज्येष्ठ निरुपणकार, थोर समाजसेवक पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेत अनेकांचा बळी गेल्यावर काहींना दिवंगत सुप्रसिद्ध अभिनेते निळू फुले यांची आठवण झाली आहे. कारण असा महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा पुरस्कार त्यांनी थेट दिगवंत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना सांगून नाकारला होता.

महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीचे सोशल मीडिया सेलचे जनरल सेक्रेटरी हृषीकेश पाटील यांना यानिमित्ताने निळूभाऊंची आठवण झाली आहे. त्यांनी ट्विटरवर याबद्दल लिहिले आहे. वास्तविक ही आठवण सामाजिक व राजकीय विषयाचे अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी सांगितली आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, २००४ साल असावे. मी निळुभाऊंकडे बसलो असताना मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा निळू फुले यांना फोन आला.

ते म्हणाले, आमच्या शासनाने २००३ या वर्षीच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी तुमची निवड केलेली आहे. तुमची संमती हवी. निळूभाऊंनी त्यांचे आभार मानले आणि या पुरस्काराला पात्र ठरावा असा मी कोणताही पराक्रम केलेला नाही. मी एक व्यावसायिक अभिनेता आहे. पोटापाण्याची सोय म्हणून अभिनय करतो.त्याचे वट्ट मोजून पैसे घेतो.यात समाजासाठी, राज्यासाठी मी काहीही केलेले नाही मुळात तुम्ही आम्हा व्यावसायिक लोकांना हा पुरस्कार देणेच चूक आहे असे सुनावले.

 

पुढे त्यांनी म्हटले आहे की, “तुम्हाला हा पुरस्कार द्यायचाच असला तर डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांना द्या. त्यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी भागात, गडचिरोलीला सर्च च्या माध्यमातून मोठे काम केलेले आहे, असे भाऊंनी सीएमना आग्रहपूर्वक सांगितले. म्हणून २००३ सालचा महाराष्ट्र भूषण डॉ. बंग पतीपत्नी यांना दिला गेला. कुठे निळूभाऊ नी कुठे निरुपणकार?” मुद्दा असा आहे की व्यावसायिक कार्य करून मोठेपणा मिरवत असलेल्या निळू फुले यांनी एकाच झटक्यात असा महत्वाचा आणि मिरवण्याजोगा पुरस्कार नाकारला होता. तर, दुसरीकडे जीवनातून कर्तव्यचा संदेश देणाऱ्या मंडळींनी असा पुरस्कार मिळाल्यावर मिरवण्यासाठी म्हणून मोठा कार्यक्रम करून अनेकांसाठी जीवघेणा प्रकार घडल्यावर अजूनही स्पष्ट माफी मागितली नाही, याबद्दल ट्विटरवर टीका सुरू आहे.

Team Global News Marathi: