“महाराष्ट्रात महिलांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई केलीच पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असो” – नाना पटोले

 

 

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या भाजपचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांना अटक करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या नवी मुंबई कोपरखैरने येथील भाजपच्या माजी नगरसेवकाला देखील अटक करण्यात आली. यामुळे राज्यातील राजकारण वेगळेच वळण घेत असल्याचे दिसत आहे.

 

या प्रकरणी कॉंग्रेस नेते नाना पटोले  यांनी देखील वक्तव्य केले आहे. ते टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना पंजाब येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेवरुन सुरू झालेले राजकारण यावर देखील भाष्य केले आहे. नाना पटोले रश्मी ठाकरे यांच्यावर झालेल्या आक्षेपार्ह टिप्पणीचा निषेध करत म्हणाले, रश्मी ठाकरे यांना ज्या पद्धतीने ट्रोल केले ते लांछनास्पद आहे.

 

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना देखील मागे ट्रॉल करण्यात आले होते त्यावेळी देखील ज्याने कोणी ट्रॉलिंग केले होते त्याला देखील तेव्हा अटक करण्यात आली होती. तसेच देवेंद्र फडणवीस नाशिकला गेले होते तेव्हा त्यांच्या बद्दल देखील अपशब्द वारण्यात आले होते त्यावेळी अपशब्द वापरणाऱ्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रात महिलांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई केलीच पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, असं नाना पटोले यावेळी म्हणाले.

Team Global News Marathi: