धमकावणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजवरच्या इतिहासात पाहिले नाहीत- देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना खास मुलाखत दिली. या मुलाखतीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. ”हात धुवून मागे लागू म्हणणारे उद्धव ठाकरेंसारखे धमकावणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजवरच्या इतिहासात पाहिले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीला शोभणारं नाही”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

 

महाविकास आघाडी सरकारला १ वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने भाजपने पत्रकार परिषद घेत राज्य सरकारची पोलखोल सुरु केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर तसेच मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली.“मुख्यमंत्र्यांची कालची मुलाखतीतली भाषा म्हणजे अशी भांडण नाक्यावर होतात. वर्षपूर्तीच्या निमित्ताने होत नाहीत, असं सांगत अशा प्रकारे चिरडण्याची भाषा ज्यांनी ज्यांनी केली ते फार काळ टिकले नाहीत”, असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

 

“हात धुवून मागे लागू, खिचडी शिजवू, ही कोणती भाषा? तुम्ही संविधानिक पदावर आहे. अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. या मुलाखतीत विकासावर अजिबात चर्चा नाही. चर्चा कशावर तर कुणाच्या मागे हात धुवून लागू आणि कुणाची खिचडी शिजवू यावर मुलाखतीचा भर होता. ही मुलाखत मुख्यमंत्रिपदाला शोभणारी नव्हती”, असेही फडणवीस म्हणाले.

 

अर्णब, कंगना प्रकरणात सरकार तोंडावर आपटलं

“पत्रकार अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्या प्रकरणाचे निकाल लागण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत आली हे बरं झालं. नाही तर ही मुलाखत म्हणजे न्यायालयाचा अवमान ठरला असता. आम्ही अर्णव आणि कंगनाच्या प्रत्येक मताशी सहमत नाही. मात्र विरोधी विचारांना चिरडूनच टाकायचं याच्याशी तर आम्ही अजिबातच सहमत नाही.सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने दिलेल्या निर्णयातूनच सरकारच्या कामगिरीची माहिती कळते. कायदा हा कुठल्याही व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी नसतो.

 

सुप्रीम कोर्टाने सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. तर मुंबई हायकोर्टानेही कंगनाविरोधातील कारवाई अप्रमाणिक आणि अशुद्ध हेतूने केल्याचा मत नोंदवत महापालिकेची कारवाई रद्द ठरवली. यासोबत संजय राऊत यांची वागणूक संसदीय सदस्याला शोभणारी नाही असं कोर्टाने झापलं”, असं फडणवीस म्हणाले.

 

शेतकऱ्यांना दिलेलं वचन मुख्यमंत्री विसरले

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना न दिलेले वचन मुख्यमंत्र्यांना लक्षात राहीलं, पण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेलं वचन ते विसरले, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. धान उत्पादकांना बोनस दिला याबाबत सरकारचं स्वागतच आहे पण सोयाबीन आणि कापूर उत्पादकांचं काय? त्यांना मदत देण्याची मागणी यावेळी फडणवीसांनी केली.

मराठा आरक्षणावरुन सरकारचा घोळ

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने अभूतपूर्व घोळ घातला असून सरकारचं धोरण हे केवळ वेळकाढूपणाचं असल्याचं फडणवीस म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत वकील आणि सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं फडणवीस म्हणाले. सरकारला मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी इच्छाच नाही हे यातून दिसून येतं, असंही ते पुढे म्हणाले.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: