महाराष्ट्राला आदर्शवत शिवसंपर्क अभियान कोल्हापूरातील शिवसैनिकांनी राबवावे – उदय सामंत

कोल्हापूर |  शिवसेनेने आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेले काम तळागाळापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी शिवसैनिकांची असून, शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून प्रभाग निहायशाखांची स्थापना करावी. या शाखांच्या माध्यमातून सर्वसामन्य नागरिकांचे प्रश्न सोडवावेत. येत्या १२ दिवसात महाराष्ट्रात आदर्शवत शिवसंपर्क अभियान कोल्हापुरातील शिवसैनिकांनी राबवावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शिवसैनिकांना दिल्या.

शिवसेनेने राज्यभरात सुरु केलेल्या शिवसंपर्क अभियानाची सुरवात कोल्हापूर शहरात शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या शिवसंपर्क मेळाव्याने करण्यात आली. या मेळाव्यात उपस्थित शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना मी शिवसंपर्क प्रतिज्ञा देत शिवसंपर्क अभियान राबविण्याचे अभिवादन दिले.

यावेळी बोलताना उदय सामंत यांनी, अंगावर आले कि शिंगावर घेण्याची शिकवण शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. आम्ही कोणाकडे शिंग घेवून मारायला जात नाही. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब कृतीतून उत्तर देत आहेत. जस जगभरात शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी एक वेगळेपण आणि वलय निर्माण केले होते तेच वलय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संकटकाळात आपल्या संयमी नेतृत्व आणि कृतीतून निर्माण करीत इतिहास रचला आहे.

महाराष्ट्र राज्य परंपरा जपणारे राज्य आहे आणि कुटुंबप्रमुखाच्या परंपरेप्रमाणे मुख्यमंत्री जनतेची काळजी घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कार्याची दखल जगभराने घेतली, तशीच दखल पंतप्रधानानीही घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या लोकप्रियतेचा धसका घेवून विरोधकांनी शिवसेनेला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. पण, शिवसंपर्क अभियानाच्या या १२ दिवसाच्या काळात शिवसेनेचे भगवे वातावरण निर्माण करून विरोधकांचे १२ वाजविल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत. विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याची गरज नाही, आपल्या कार्यातून विरोधकांची तोंड बंद करण्याचा हातखंडा शिवसेनेत आहे असे सुद्धा त्यांनी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: