महापुरुषांवर करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्य विरोधात वरळी बंदची हाक

 

महापुरूषांबाबतच्या वादग्रस्त विधानाचं प्रकरण आता दिवसेंदिवस चिघळत चाललं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून काल पुण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. तर आता मुंबईतही गुरुवारी ‘वरळी बंद’ची हाक देण्यात आली आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वरळीत बंद पाळण्याचं आवाहन सर्व आंबेडकरवादी तसेच बहुजन महापुरुषांना पक्ष संघटनांनी केलं आहे.

भाजपा आमदार राम कदम यांनी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणानंतर खुली धमकी देत घरात घुसून उत्तर देण्याचं विधान केलं होतं. “आयुष्यभर त्यागपूर्ण आणि समर्पित जीवन आयुष्यभर जगणारे आमचे चंद्रकांतदादा यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी षडयंत्र रचून भ्याड शाहीचा हल्ला केला. शाही हल्ला करणाऱ्यांच्या घरात घुसून त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर कसं द्यायचं हे भाजपाच्या कार्यकर्त्याला माहित आहे”, असं राम कदम म्हणाले होते.

राम कदम यांच्या या विधानाचाही तीव्र शब्दात विरोध करण्यात येत आहे. तसंच राम कदम यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी ‘वरळी बंद’ची हाक देणाऱ्या संघटनांनी केली आहे. राम कदम यांच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेण्यात आला तर ‘वरळी बंद’ मागे घेण्याचा निर्णय घेऊ, अशी भूमिका बंदची हाक देणाऱ्या संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे उद्याच्या ‘वरळी बंद’चा अंतिम निर्णय आज दुपारपर्यंत घेणार असल्याचं संघटनांनी सांगितलं आहे.

Team Global News Marathi: