महागाई, बरोजगारी व ढासळत्या अर्थव्यव्यस्था या विविध मुद्द्यावर काँग्रेसचे राज्यभरात आंदोलन

 

केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाई वाढत असून त्यातच जीवनाश्यक वस्तुंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पहात आहे. बेरोजगारीचा उच्चांक झाला असून तरुणवर्गाचे भवितव्य अंधारात आहे. महागाई, बरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत म्हणून उद्या ५ ऑगस्ट रोजी राजभवनला घेराव घातला जाणार असून त्यानंतर जेलभरो करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, पेट्रोल, डिझेल, एलपीसी गॅस, सीएनजी, पीएनजीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. महागाईने जनता त्रस्त असताना केंद्र सरकारने दूध, दही, पनीर, आटा, तेल, तूप यासह जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. मोदी सरकारने जीएसटीतून शाळकरी मुलांनाही सोडले नाही, शालेय वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. रुग्णालयात उपचार घेण्यावरही जीएसटी भरावा लागणार आहे.

मागील ४५ वर्षातील बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. २०१४ ते २०२२ पर्यंत विविध विभागांमध्ये नोकऱ्यांसाठी २२ कोटी अर्ज मिळाले मात्र केवळ ७ लाख उमेदवारांना नोकरी देण्यात आल्याचे केंद्र सरकारनेच लोकसभेत सांगितले आहे. एवढी भयानक अवस्था आहे. तर लष्करात भरती होऊन देशाची सेवा करु पाहणाऱ्या तरुणांना फक्त ४ वर्षाची सेवा व नंतर निवृत्ती अशी ‘अग्निपथ’ नावाची योजना आणली आहे. या योजनेला तरुण वर्गांचा तीव्र विरोध असून काँग्रेस पक्ष तरुणांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. ही योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले

Team Global News Marathi: