महागाई आणि बेरोजगारी विरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन

 

काँग्रेसने आज महागाई आणि बेरोजगारी विरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणार आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी करत आहे.

या मुद्द्यावरुन संसदेत सरकारला घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तर एक पाऊल पुढे जात काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारीबाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर आक्रमक भूमिका घेतली आहे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेत ‘मी मोदींना अजिबात घाबरत नाही. सत्य दडपता येत नाही. तुम्हाला जे करायचे आहे ते करा, पण सत्याला आळा घालता येत नाही,” असं म्हटलं होतं.

काँग्रेसच्या मुख्यालयात गुरुवारी रात्रीपासूनच काँग्रेस कार्यकर्ते जमू लागले. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. “जंतर-मंतर वगळता, नवी दिल्ली जिल्ह्यातील संपूर्ण भागात CrPC कलम 144 लागू आहे. सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था, रहदारीच्या कारणांमुळे 5 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली जिल्ह्यातील परिसरात आंदोलन/धरणे/घेरावाला परवानगी देता येणार नाही,” असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्याने राहुल गांधी म्हणाले होते की, “लोकशाहीत आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे. पोलीस परवानगी देत ​​नाहीत, ठीक आहे, रोखून दाखवा.”

काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी सांगितलं की, “वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लादल्याच्या विरोधात काँग्रेस दिल्लीत निदर्शने करणार आहे. याशिवाय राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढणार असून पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव देणार आहोत.” काँग्रेसचे लोकसभा आणि राज्यसभा खासदार संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढणार आहेत.

Team Global News Marathi: