माफी मागा, नाहीतर स्वत:लाच जोडे मारा; शिवसेनेची राज्यपालांवर घणाघाती टीका

 

छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील नायक झाले असल्याचे सांगत नवा वाद राज्यपाल भगतसिंह कोश्यारीयांनी अंगावर ओढवून घेतला असून या विरोधात आता शिवसेनेने सडकून टीका केली आहे. शिवसेनेने राज्यपालांच्या वक्तव्यावरून भाजप आणि शिंदे गटावरही निशाणा साधला आहे. शिवरायांचा अपमान करणार्‍यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल, असे शिवसेनेने म्हटले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रात पोहोचलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेतील एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या दया याचिकेची कागदपत्रे दाखवून वादळ ओढवून घेतले तेव्हा महाराष्ट्रातील भाजप व त्यांच्या सोबतचा मिंधे गट स्वाभिमान, अपमान वगैरेंच्या नावाने वळवळू लागला, त्यातले काही वळू रस्त्यावर उतरले. त्यांनी ”शिवसेना आता काय करणार?” असे विचारून राहुल गांधी यांना जोडे मारण्याचा उपक्रम सुरू केला. आता हे सर्व जोडे स्वत:च्याच हाताने स्वत:च्याच कानाखाली मारण्याची वेळ या जोडेबाजांवर आली असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा माती खाल्ली व छत्रपती शिवरायांचा अपमान केला असल्याचे शिवसेनेने म्हटले. शिवाजी महाराज हे जुनेपुराणे, कालबाह्य झाले आहेत, छत्रपती हे जुन्या जमान्यातील ‘हीरो’ आहेत” असे विधान करून महाराष्ट्राच्या अस्मितेवर व स्वाभिमानावर पाय ठेवला. हे भयंकरच आहे. महाराष्ट्रात वीर सावरकरांच्या अवमानाचा मुद्दा गाजत असतानाच भाजप व मिंधे गटाचा पाय त्यांच्याच राज्यपालांच्या धोतरात अडकून कपाळमोक्ष झाला असल्याचे शिवसेनेने म्हटले.

भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची ‘माफीवीर’ म्हणून टवाळी केली. शिवाजी महाराजांनी औरंगजेबास पाच माफीची पत्रे पाठविल्याचा भलताच इतिहास उकरून काढला व महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला केला. वीर सावरकरांचा बचाव करताना त्यांनी शिवरायांना ‘माफीवीर’ म्हणून देशातील समस्त शिवराय भक्तांच्या अस्मितेचा पाचोळा करून टाकला असल्याचे त्यांनी म्हटले. वीर सावरकरांच्या निमित्ताने हातात जोडे घेऊन रस्त्यावर उतरणारे भाजपचे शूरवीर व मिंधे गटाचे नरवीर आता कोणत्या बिळात लपून बसले आहेत असा सवालही शिवसेनेने केला आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढार्‍यांनी शिवतीर्थावर येऊन महाराष्ट्राची माफी मागावी व अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावी, तरच त्यांचा स्वाभिमान की काय तो महाराष्ट्राला दिसेल असेही शिवसेना ठाकरे गटाने सुनावले.

Team Global News Marathi: