“मी राज्यपालांना व्यक्तिगत ओळखते, ते मनापासून मराठी लोकांवर प्रेम करतात”

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानामुळे वादंग निर्माण झाला. अनेक राजकीय नेते आणि संघटनांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. यानंतर अमृता फडणवीस यांनी राज्यपालांची पाठराखण करत मोठे वक्तव्य केले आहे. मी राज्यपालांना व्यक्तिगत ओळखते. त्यांना मराठी भाषेचे प्रेम आहे. ते एकमेव राज्यपाल आहेत, जे मराठी शिकत आहेत. मराठी बोलण्याच्या वेगात ते काही बोलून जातात, त्याचा वेगळा अर्थ काढला जातो. ते मनापासून महाराष्ट्र आणि मराठी लोकांवर प्रेम करणारे राज्यपाल आहेत, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

तसेच, अमृता फडणवीस यांनी श्रद्धा वालकर हत्येबाबत भाष्य केले. “श्रद्धाबाबत झाले त्याबाबत दुःख होतंय. खोलात जाऊन तिला न्याय मिळाला पाहिजे. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देणे गरजेचे आहे”, असेही त्या म्हणाल्या.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानामुळे राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. विविध क्षेत्रामधून राज्यपालांच्या विधानाचा निषेध करण्यात येत आहे.

तसेच राज्यपालांना हटवण्याची मागणीही करण्यात येत आहे. दुसरीकडे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यात ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाची भेट घेणार असल्याचे समजते. तसेच, राज्यपाल बदलीबाबत केंद्रीय स्तरावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय म्हणाले होते राज्यपाल?

आम्ही शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असे वाटते तुम्हाला कोणी विचारले तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. मी आधुनिक युगाबाबत बोलत आहे. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: