‘या’ शेतकरी नेत्यांविरोधात लुकआऊट नोटीस जारी; ३७ नेत्यांवर गुन्हे

नवी दिल्ली –  प्रजासत्ताकदिनी ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या परिसरात धार्मिक झेंडा लावल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अनेकांविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांना अराजकता पसरविण्याच्या गुन्ह्याखाली कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली असून मेधा पाटकर, दर्शन पाल, योगेंद्र यादव, राजिंदरसिंग, बूटा सिंग व बलबीर सिंग राजेवाल आदी ३७ शेतकरी नेत्यांविरुद्ध समयपूर बादली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील काहींना भारताबाहेर जाण्याची परवानगी नाकारून त्यांना लुकआऊट नोटीसही (एलओसी) बजावण्यात आली आहे. या नेत्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शेतकरी नेत्यांबरोबर चर्चेस सरकारने पुन्हा तयारी दाखविली असली तरी नोटिसा दिलेल्या नेत्यांना चर्चेत सहभागी करून घेण्यास सरकारची तयारी नसल्याचे आज सांगण्यात आले. योगेंद्र यादव यांना चर्चेच्या परिसरात येण्यास सरकारने पहिल्यापासून विरोध केला होता व ४१ आंदोलनकर्त्या संघटनांच्या शेतकरी नेत्यांनी तो मान्य करून यादव यांना एकाही चर्चेत प्रत्यक्ष सहभागी करून घेतलेले नव्हते.

लाल किल्ला हा ऐतिहासिक व प्राचीन स्मारकांच्या यादीतील वास्तू असल्याने येत्या ३१ जानेवारीपर्यंत तो पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे पुरातत्त्व विभागाने म्हटले आहे. लाल किल्ला व दिल्लीच्या विविध भागांतील हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी कारवाईचा फास आवळण्यास सुरवात केली आहे.

दिल्लीत अटकसत्र सुरूच
टिकैत यांच्या गाझीपूर सीमेवरील आंदोलनस्थळावरील तंबूच्या बाहेर पोलिसांनी नोटीस चिटकवली होती. त्यांनी नोटिशीला उत्तर देण्यासाठी ३ दिवसांचा वेळ मागितला आहे. २६ जानेवारीच्या हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत १९ लोकांना अटक करण्यात आली असून २५ हून जास्त गुन्हेगारी खटले दाखल करण्यात आले आहेत. हिंसाचारात ३९४ पोलिस जखमी झाल्याचे दिल्ली पोलिस आयुक्तांनी सांगितले होते. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे

ग्लोबल न्युज नेटवर्क: