लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वास राष्ट्रपतींना देण्यात येणार निमंत्रण

 

मुंबई | राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दीचे यंदाचे वर्ष लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व म्हणून साजरे होणार आहे. यानिमित्त जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर शाहू विचारांची महती सांगणारे कार्यक्रम सादर होणार आहेत. त्याची सुरुवात भवानी मंडपात १८ एप्रिलला होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांच्या रथोत्सवाच्या दिवसापासून होत आहे, अशी घोषणा पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

खासदार संभाजीराजे यांनी शताब्दीच्या मुख्य सोहळ्यासाठी राष्ट्रपतींना कोल्हापुरात आणण्याचा शब्द दिला. त्यासाठी राज्य सरकारचे पत्र देण्याची जबाबदारी पालकमंत्री पाटील व मुश्रीफ यांनी घेतली. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते व पालकमंत्री पाटील, ग्रामविकास मंत्री मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार जयंत आसगावकर, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार व डॉ. रमेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कृतज्ञता पर्वाच्या लोगोचे अनावरण केले.

राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृहात यासंदर्भात प्राथमिक नियोजनाची बैठक झाली. प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली.

Team Global News Marathi: