लोकांचे पैसे लुटण्यासाठी ‘त्याने’ बनवली स्वतःची बनावट बँक अन उघडल्या १० शाखा

 

 

आजवर तुम्ही बँकेच्या नावाने बनावट फोन कॉलद्वारे फसवणुकीच्या विविध घटना ऐकल्या असतील, परंतु तुम्ही असा प्रकार यापूर्वी कधीच पाहिलाही नसेल आणि कधीच ऐकलाही नसेल. तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, एका 44 वर्षीय व्यक्तीने लोकांची फसवणूक करण्यासाठी संपूर्ण बनावट बँकच तयार केली.

तामिळनाडू पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने चंद्र बोस यांना स्वतःची बँक उघडून लोकांकडून 2 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडून एक आलिशान कार आणि 56 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. मात्र, या फसवणुकीच्या प्रकरणात आरोपी एकटा नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचे अनेक साथीदारही यामध्ये सामील असल्याचे पोलीस सांगत आहेत. गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक त्याचा शोध घेत आहे.

तामिळनाडू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रबोस यांनी कोणत्याही परवान्याशिवाय स्वतःची ग्रामीण आणि कृषी शेतकरी सहकारी बँक (RAFC) स्थापन केली. आश्चर्याची बाब म्हणजे, राज्याच्या विविध भागात दहाहून अधिक शाखा उघडून सुमारे तीन हजार लोकांची फसवणूक केली. त्यांनी मदुराई, विरुदाचलम, कल्लाकुरिची, नमक्कल, पेरांबलूर, इरोड, सेलम आणि चेन्नई या शहरांमध्ये बँकेच्या दोन शाखा उघडल्या.

तपासादरम्यान ग्रामीण व कृषी सहकारी बँकेच्या नावाने बनावट वेबसाइटद्वारे ग्राहकांना पासबुक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ज्वेलरी आणि ऑनलाइन मनी ट्रान्सफर आदी प्रिंट करून दिल्याचे आढळून आले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने अंबत्तूर येथे परवान्याशिवाय बँके चालत असल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर चेन्नई शहर पोलिसांनी RAFC बँकेच्या कामकाजाची चौकशी सुरू केली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहाय्यक महाव्यवस्थापकाने (AGM) औपचारिक तक्रार देखील दाखल केली होती, ज्याच्या आधारावर गुन्हे शाखेने तपास सुरू केला. पोलिसांनी सांगितले की, बँकेचे सभासद शुल्क म्हणून ७०० रुपये गोळा केले जात होते. तसेच बँक ५०० रुपये शिल्लक असलेल्या ग्राहकांना क्रेडिट/डेबिट कार्ड जारी करण्यात येत होते आणि ग्राहकांचे बँक खाते क्रमांक म्हणून कार्ड क्रमांक दिले जात होते तसेच ग्राहकांना सुलभ कर्जही दिले.

Team Global News Marathi: