खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी आघाडी सरकारकडून लादण्यात आलेल्या लॉकडाऊन विरोधात निषेध करत पोवई नाक्यावर भीक मागो आंदोलन केले . या आंदोलना दरम्यान जमा झालेली ४५० रुपयांची भीक त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली. तसेच आघाडी सरकारने लॉकडाऊनच्या धोरणाचा पुन्हा विचार करावा अशी मागणी उदयनराजे यांनी केली .
या सरकारच्या लॉकडाऊन निर्णयाविरोधात आता खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. तसेच आघाडी सरकारच्या या निर्णयाविरोधात त्यांनी भीक मागो आंदोलन सातारा येथे केले होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या लॉकडाऊन निर्णयावर घणाघाती टीका केली होती.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या दोन दिवसीय पूर्ण लॉकडाउनला साताऱ्यात शनिवारपासून सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी लॉकडाउनला जिल्ह्याच्या विविध भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार, वाहतूक व्यवस्था बंद राहिल्याने सर्वत्र सामसुम दिसत होती.
मात्र, या लॉकडाउनला साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र विरोध केला . हा विरोध त्यांनी थेट कृतीत आणला . येथील पोवई नाक्यावर त्यांनी हातात थाळी घेऊन ठाकरे सरकारने पुकारलेल्या लॉकडाउनचा निषेध केला. त्यानंतर उदयनराजेंनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फेरफटका मारत शासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त केला.