लीलावती रुग्णालयाला पालिकेचा दणका, नवनीत राणा प्रकरणात धाडली नोटीस

 

मुंबई | तुरुगांतून सुटका झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लीलावती रुग्णालयात त्यांचा एमआरआय (MRI) स्कॅन करण्यात आला. एमआरआय स्कॅन करताना खासदार नवनीत राणा यांचा फोटो व्हायरल झाला होता. त्यात फोटोप्रकरणी मुंबई महापालिकेने लिलावती रुग्णालय प्रशासनाला नोटीस बजावली आहे. लिलावती रुग्णालय प्रशासनाला 48 तासात उत्तर देण्याचे निर्देश मुंबई मनपाने दिलेत.

खासदार नवनीत राणा यांचा एमआरआय स्कॅन करताना फोटो व्हायरल झाल्याप्रकरणी मुंबई पालिकेच्या एच पश्चिम विभागाने लिलावती रुग्णालय प्रशासनाला नोटीस बजावली आहे. सिटीस्कॅन करताना फोटो काढणे नियमांचे उल्लंघन असल्याने ही नोटीस बजावण्यात आली असून यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि राणा यांच्यातील वाद उफाळून येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या फोटोवरुन शिवसेनेनं लीलावती रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं होतं. एमआरआय काढताना फोटो काढलाच कसा? ही परवानगी दिली कुणी…? असे सवाल विचारत राणांच्या एमआरआयचा रिपोर्ट देईपर्यंत हटणार नाही असा इशारा शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी लीलावती रुग्णालय प्रशासनाला दिला होता. त्यानंतरच लिलावती रुग्णालय प्रशासनाला पालिकेने नोटीस बजावल्याच समोर आलंय.

Team Global News Marathi: