” माझ्यासारख्या मराठी मातीतल्या कलावंताला उभं र्‍हायला यश्टीनं लै मोलाची साथ दिलीय”

 

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागच्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी राज्य सरकार विरोधात आंदोलन करत आहे. मात्र या आंदोलनावर अद्यापही तोडगा निघालेला नाहीये. सर्वसामान्य प्रवाशांची लालपरी म्हणून ओळखली जाणारी तसेच खेडो-पाड्यात सामान्य नागरिकांना शहराशी जोडून ठेवण्याचे काम करणारी लालपरीची चाके आज कुठेतरी संपामुळे थांबली आहेत.

यावर रोखठोक भूमिका मांडणारे आणि विविध विषयावर परखड भाष्य करून जनजागृती करणारे अभिनेता किरण माने यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या संदर्भात फेसबुकवर पोस्ट लिहून त्यांनी त्यावेळी शूटिंगसाठी सातारा टू मुंबई एसटीच्या प्रवासाच्या आठवणींना आपल्या पोस्टमधून उजाळा दिला दिला आहे.

काय लिहिलं आहे फेसबुक पोस्टमध्ये वाचा !

भावांनो, एस.टी. महामंडळाची लालपरी ही माझी पहिली प्रेयसी ! माझ्या पंचवीस वर्षांच्या श्ट्रगलमधली चौदा-पंध्रा वर्ष, मी लाल परीच्या साथीनं ‘सातारा-मुंबई-सातारा’ प्रवास केलाय.. सातारा डेपोतले ८०% कंडक्टर-डायवर माझे अजूनबी जिगरी दोस्त हायेत ! प्रवासात ओळख झालेले कितीतरी प्रवासी अजूनबी प्रेमानं फोन करत्यात. मला घरातनंं निघायला उशीर झाला तर निघालेली यश्टी माझ्यासाठी थांबायची.. परेल डेपोतबी आपला तसाच ‘वट’ हुता.. शिवाजी मंदिरमधला माझा नाटकाचा प्रयोग संपून मी डेपोत पोचेस्तोवर लालपरी माझी वाट बघत उभी र्‍हायची.. पन आज तीच यश्टी लै दिस झालं उदास होऊन जागेवर थांबलीय. माझी लालपरी रूसलीय…

…आपल्या भावासारख्या असलेल्या कामगारांच्या सगळ्या मागन्या मान्य व्हाव्यात.. एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करण्याबाबत ठोस निर्नय व्हावा आन् आणि आर्थिक चनचनीमुळं यश्टी कामगारांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखल्या जाव्यात या मागन्यांना माझा फूल्ल आन् फायनल पाठिंबा हाय.. पन.. पन.. पन..

…यश्टीत काम करनार्‍या माझ्या भावांना किरन मानेची एकच हात जोडून इनंती हाय.. एका गोष्टीबाबत तुम्ही शेतकरी आंदोलनाचा आदर्श घ्यावा, असं मला लै लै लै मनापासून वाटतं ! नीट ऐका – आंदोलन करताना, शेतकर्‍यांनी एकाबी राजकीय पक्षाला मध्यस्तीला घेतलं नाय गड्याहो !! मुद्दाम राजकीय नेते आंदोलनात घुसवून आंदोलन बदनाम करायचा प्रयत्न झाला.. पन शेतातनं तन कोळपावं तसं राजकीय नेते उपटून फेकून दिले त्यांनी.. बळीराजा लै हुशार असतो.. त्यांनी स्वत:च्या दमावर आंदोलन केलं, म्हनून ते जिंकले. आपन त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आंदोलन करूया… राज्यसरकार नाय झुकलं तर नांव बदलून ठेवीन !

आवो, जे लोक शेतकर्‍यांची ‘आंदोलनजीवी’ म्हनून टवाळी करत होते.. त्यांना देशद्रोही म्हनत होते.. खलीस्तानी म्हनत होते.. त्याच टाळक्यांना आता ‘सोयीनं’ तुमच्या आंदोलनाचा पुळका आलाय.. लै कड वढायला लागल्यात तुमचा ही कडू बेनी.. ती ‘किड’ पयली बाजूला ठेवा.. ते लोक सत्तेत असते तर तुमालाबी अतिरेकी ठरवायला कमी केलं नसतं त्यांनी.. “आजकाल काय गरज आहे एस.टी.ची?? बंद करून टाका कायमची.” असे लेखावर लेख पोश्ट केले असते बांडगुळांनी.. आता ‘बूच’ बसलंय म्हनून तुमची बाजू घेत्यात ते.. आवो, ती सत्तेसाठी हपापलेली विषारी सापाची पिलावळ हाय.. त्यांना तुमच्या आंदोलनाचा फायदा घेऊ देऊ नका. तुमी बळीराजासारखं तुमच्या सोत्ताच्या जीवावर-सोत्ताच्या हिमतीवर लढा.. मग बघा.. त्यानंतर अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी नाय उभा र्‍हायला तरी नांव बदलून ठेवीन मी !

…माझ्यासारख्या मराठी मातीतल्या कलावंताला उभं र्‍हायला यश्टीनं लै मोलाची साथ दिलीय.. सातारी मातीची शपथ घेऊन सांगतो, तिच्याशी गद्दारी नाय करनार मी. तुम्ही कृष्नेच्या पान्याइतके निर्मळ आहात. स्वबळावर लढा. राजकीय पक्ष तांदळातल्या खड्यागत बाजूला ठेवा. गरज नाय आपल्याला अशा घातकी लोकांची.

माझाच काय, प्रत्येक संवेदनशील मराठी मानसाचा तुमच्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा हाय.. लढा..बळीराजानं सुरूवात केलीय. आवो, केंद्रसरकारनं हतबल होऊन लोटांगन घातलं, तिथं राज्यसरकारची काय कथा? हे सरकारबी झुकून तुमच्या पायाशी येईल. मग आपली लालपरी पुन्ना खेड्यापाड्यातनं भिरीभिरीभिरी फिराय लागंल… गोरगरीबांची सेवा करायला पुन्हा नव्या जोमानं सुरूवात करंल ! ❤️
– किरण माने.

Team Global News Marathi: